उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामाला सरंक्षण देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्विकारताना उल्हासनगर पालिकेचे प्रभाग समिती १चे सहायक आयुक्त अजित गोवारी, प्रभारी मुकादम प्रकाश संकत, खाजगी वाहनचालक प्रदीप उमाप यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी मूळचा सफाई कामगार असलेल्या प्रकाश संकतची मूळ पदावर रवानगी झाली होती. मात्र, तो मूळ पदावर का गेला नाही?, त्याची बदली कोणी थांबवली?, याचा तपास लाचलुचपत विभागाने करून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सिंडीकेट नष्ट करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
तक्रारदार करोतीया यांचे कॅम्प १ मधील भिमनगर परिसरात अनधिकृत बांधकाम चालू होते. या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी व मुकादम प्रकाश संकत हे लाचेची मागणी करत होते. मात्र, करोतीया हे पैसे देण्यास तयार नसल्याने त्यांचे बांधकाम दोनदा तोडण्यात आले. तक्रारदार करोतीया यांनी ३ मार्च रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. प्रकाश संकत यांने तक्रारदार यांना सोमवारी सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांच्याकडे घेऊन गेला. तिथे झालेल्या संभाषणात अजित गोवारी यांनी प्रकाश संकत याला लाच घेण्यास प्रोत्साहित केले. होळीच्या दिवशी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्विकारताना खाजगी वाहन चालक प्रदीप उमाप, अजित गोवारी आणि प्रकाश संकत याना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, प्रकाश संकत हा मूळचा सफाई कामगार म्हणून पालिकेच्या आरोग्य सेवेत नोकरीला लागला आहे. मात्र, पगारापेक्षा अधिकची कमाई करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राजकीय संबंध वापरून त्याने पालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागात म्हणजेच, प्रभाग समितीमध्ये बदली करून घेतली. पैशाचे आर्थिक व्यवहार आणि वरिष्ठांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरल्याने त्याला प्रभारी बिट मुकादम हे पद बहाल करण्यात आले होते.
दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागात झाडू मारण्यासाठी तसेच इतर काम करण्यासाठी सफाई कामगार यांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यालय विभागाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी २६ डिसेंबर २०२२ ला विविध विभागात आरामदायक किंवा मलईच्या जागेवर कार्यरत असलेल्या ४६ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी कार्यालयीन आदेश काढून आरोग्य विभागात बदली केली होती. मात्र संकत याच्यासह अन्य तीन कर्मचाऱ्यानी सिंडिकेटचा वापर करून बदली थांबविली. डिसेंबर महिन्यात प्रकाश हा त्याच्या मूळ पदावर गेला असता तर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला नसता अशी चर्चा नागरिकांच्यात पसरली आहे.
ठाणे जिल्हा हा सत्तेचे केंद्र बनल्यापासून अनधिकृत बांधकाम विभाग, नगररचना विभाग याच्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची पैशांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांनी पैशांची देवाण- घेवाण करण्यासाठी खाजगी माणसे, खाजगी चालक यांची नेमणूक केली आहे. ही बाब लाचलुचपत विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनीही तशाच प्रकारे सापळे रचण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुढील काळात आणखीही काही मोठे मासे या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.
हेही वाचा :