ठाणे : आठ ते नऊ वर्षांपासून ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात मुख्य मार्गिकेतून नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या वेशीवरील भोलानगर येथील बाधित होणाऱ्या 950 घरांपैकी 348 घरांच्याअंतिम सर्व्हेचे काम झाले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे बाळकुम येथील निवासी संकुलात एमएमआरडीकडून पुनर्वसन करण्यात येणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी पनवेल-वाशी-कल्याण रेल्वे प्रकल्पासाठी ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. एमआरव्हीसी, एमएमआरडीए, ठाणे महापालिका, रेल्वे बोर्ड या प्राधिकरणाकडून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील बाधित सावित्रीबाई नगर येथील काही घरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र त्यापुढील भोलानगर, न्यू शिवाजी नगर, कळवा स्टेशन रोड परिसरातून जाणाऱ्या पुलाच्या मार्गिकेतील नागरिकांनी सरसकट पुर्नवसनाची मागणी लावून धरीत हा प्रकल्प रोखून धरला आहे.
एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन) भोलानगर येथील नागरिकांच्या पुर्नवसनाचा अहवाल सादर करीत 348 घरांच्या सर्व्हेचे काम पुर्ण झाले असून पुलासाठी आवश्यक असणाऱ्या 348 घरांचे पुर्नवसन करण्यासाठी एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठवल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएने घरांचा सर्व्हे पुर्ण केला तसेच या ठिकाणी पुर्नवसीतांची नावे प्रकाशित करुन बाधित नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. एमएमआरडीच ठाण्यातील बाळकुम परिसरात रेंटल हौसिंग सोसायटीमध्ये करण्यात येणार आहे.
उर्वरित घरांसाठी एसआरए
भोलानगर, न्यू शिवाजी नगर येथील 3500 घरांचे एस.आर.ए.च्या माध्यमातून राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिका पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर ठाणे महापालिकेने आमदार, खासदार, माजी लोकप्रतिनिधी आणि भोलानगर रहिवासी संघाच्या मागणीनुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.