भिवंडीत 3 वर्षानंतर प्रशासकीय राजवटीचा काळ संपुष्टात येणार Pudhari News Network
ठाणे

Bhiwandi Municipal Elections : भिवंडीत 3 वर्षानंतर प्रशासकीय राजवटीचा काळ संपुष्टात येणार

2026 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर पदाची रिकामी खुर्ची पदभार स्वीकारणार

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : सुमित घरत

2026 महापालिका सार्वत्रिक निवडणुकांचे बिगूल वाजले असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकीय मैत्री बाजूला सारून मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाने नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेने मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच भिवंडी महापालिकेची 3 वर्षांपासून रिकामी असलेली महापौर पदाच्या जागेची खुर्ची पदभार स्विकारणार आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासकीय राजवटीपासून मोकळा श्वास घेणार असून भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाची वाट मोकळी होणार असल्याचे मत शहरातील सजग नागरिकांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

16 डिसेंबर 2001 मध्ये भिवंडी निजामपूर नगरपालिकेचे रूपांतर भिवंडी निजामपूरा शहर महानगरपालिकेत झाल्यानंतर प्रथमतः भिवंडी महापालिकेची निवडणूक मे 2002 यावर्षी पार पडली. त्यावेळी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता. त्यांनी 13 जून 2002 ते 17 फेब्रुवारी 2005 पर्यंत महापौर पदाचा पदभार स्विकारला.

त्यानंतर 18 फेब्रुवारी 2005 ते 12 जून 2007 या अडीच वर्षांपर्यंत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी महापौर पदाचे काम पाहिले. त्यानंतर 13 जून 2007 ते 14 डिसेंबर 2009 पर्यंत काँग्रेसचे जावेद गुलाम मो.दळवी यांनी कार्यभार सांभाळला. तर 15 डिसेंबर 2009 ते 10 जून 2012 या जवळ जवळ तीन वर्षात कोणार्क विकास आघाडीच्या यशश्री राजन कडू यांनी महापौर पदाची धुरा सांभाळली.

दरम्यान कडू यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर 11 जून 2012 ते 10 डिसेंबर 2014 पर्यंत पती विलास पाटील यांच्या खंबीर पाठिंब्याने प्रतिभा विलास पाटील ह्या दोन वर्षांकरिता महापौर पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर ताडाळी येथील शिवसेनेचे तुषार यशवंत चौधरी हे 11 डिसेंबर 2014 ते 8 जून 2017 दरम्यानच्या कालावधीत महापौर पदी विराजमान होते. मात्र त्यानंतर पुन्हा प्रस्थापित म्हणून काँग्रेसचे जावेद दळवी यांनी 9 जून 2017 ते 8 डिसेंबर 2019 पावेतो महापौर पदाचे काम बघितले.

त्यानंतर पुन्हा प्रस्थापितांची सत्ता म्हणून विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा पाटील यांची महापौर पदी वर्णी लागली होती. मात्र कोरोना महामारीच्या काळानंतर 8 जून 2022 रोजी प्रतिभा पाटील यांच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येवून प्रशासक राजवट सुरू झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत महापालिकेची धुरा प्रशासक म्हणून आयुक्त सांभाळत आहेत.

त्यामुळे जून 2022 नंतर महापौर पदाची खुर्ची आयुक्त पदाच्या नावाखाली प्रशासकांच्या हाती येवून महापौर पदाची खुर्ची रिकामी आहे. मात्र 2026 मध्ये ही महापौर पदाच्या खुर्चीची 3 वर्षांची प्रतीक्षा संपणार असून रिक्त पद भरणार असल्याने महापौर पदाची रिकामी खुर्ची पदभार स्विकारणार असल्याचे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे. त्यामुळे 8 वर्षानंतर होत असलेल्या या महापौर पदाच्या चुरशीच्या मनपा निवडणुकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांशी असलेली एकनिष्ठता आणि बांधिलकी झुगारून आजी-माजी उमेदवार मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली वार्डातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आघाडीत बिघाडी आणि युतीत त्रुटी या गणिता प्रमाणे मोर्चे बांधणीला लागल्याचे दिसून येत आहे.

2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसला महापौरपद

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला होता.

भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसने 47 जागा मिळवून बहुमत संपादन केले. तर भाजपने 20, शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात काँग्रेसने सेनेला उपमहापौर पद दिले होते. त्यामुळे भाजप आणि कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला बसली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT