डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली/ढोकळीपासून चिंचपाड्यापर्यंत मोकळ्या जागा आणि फुटपाथसह रस्ते बळकावून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा बोजा-बिस्तऱ्यावर गेल्या दोन दिवसांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात आली.
यावेळी कारवाई दरम्यान अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र राजेंद्र साळुंखे यांनी कारवाईला वेग देऊन दोन जेसीबींच्या साह्याने आडीवली-ढोकळीपासून चिंचपाड्यापर्यंत विखुरलेला बेकायदा बाजार उद्ध्वस्त केला. या भागातील सर्व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने परिसरातील त्रस्त रहिवाशांनी केडीएमसीच्या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे.
वैद्यकीय कारणामुळे आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त असल्याने अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आय प्रभागातील रस्त्यांच्या दुतर्फा भरणारे बाजार, फेरीवाले आणि बेकायदा बांधकामांवर कारवाईची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान बेकायदा कामांवर जेसीबीच्या सहाय्याने बेधडक कारवाई करण्यात आली.
टिटवाळ्याच्या अ प्रभागात असताना वडवली भागातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही न जुमानता त्यांनी धाडस करून बेकायदा बांधकामे भुईसपाट केली होती. मात्र या दरम्यान झालेल्या त्रासाला न डगमगता राजेंद्र साळुंखे यांनी ग प्रभागातही त्यांची मोहीम फत्ते केली.
आडीवली, ढोकळी आणि चिंचपाडा परिसरात स्थानिक भूमाफियांनी मोकळ्या जागा हडप करून त्या जागांवर शेड्स टाकून त्याखाली मटण, चिकन, मासळी, वडा-पाव, फळे आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू करून मोठा बाजार भरवला होता.
या व्यतिरिक्त भंगार साठ्याची गोदामे, लोखंड आणि काच/पत्र्याच्या भंगाराच्या बाजार थाटण्यात आला होता. अशा बेकायदा बाजाराकडून केडीएमसीला एक छदामही महसूल मिळत नसल्याची माहिती अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांना मिळाली होती. त्यातच फुटपाथसह रस्ते बळकावून धंदा/व्यवसाय करणाऱ्यांमुळे वाहतूकदार, पादचारी आणि रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांच्या तक्रारींत वाढ झाली होती.
रहिवाशांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या भागाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर भूमाफिया आणि बेकायदा बांधकामांसह फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी दोन जेसीबी घेऊन घुसलेल्या पथकाने आडीवली, ढोकळी आणि चिंचपाडा भागामध्ये अचानक बाजार हटविण्याची कारवाई सुरू करून ही करवाईची मोहीम फत्ते करण्यात आली.
फुटपाथ, रस्ते झाले मोकळे
आडीवली, ढोकळी आणि चिंचपाडा भागातील मोकळ्या जागांवर, फुटपाथ आणि रस्ते अडवून सुरू करण्यात आलेले बेकायदा बाजार तोडकाम पथकाने उद्ध्वस्त करून टाकले. ही कारवाई सुरू करताच यावेळी साऱ्यांची पळापळ झाली होती. या भागातील 20 हून अधिक पक्की बेकायदा बांधकामे, टपऱ्या आणि शेड्स अतिक्रमण नियंत्रण पथकाने जमीनदोस्त करण्यात आले.
विशेष म्हणजे या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोळसेवाडी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकीकडे काही स्थानिकांकडून अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांना कारवाई रोखण्याची मागणी केली. वरिष्ठांच्या आदेशांनुसार ही कारवाई सुरू असल्याचे सांगून अधीक्षक साळुंखे यांनी दबाव टाकणाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तर दुसरीकडे अतिक्रमणांनी वेढलेले फुटपाथ आणि रस्ते मोकळे करण्यात आल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
आय प्रभाग हद्दीतील बेकायदा बाजार, फेरीवाले आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशांनुसार पावसाळा सुरू होण्याच्या आत या भागातील सर्व बेकायदा बांधकामे टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त करून फुटपाथ आणि रस्ते मोकळे करण्यात येणार असल्याचे अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले.