ठाणे : राज्यातील सर्व खाजगी एसटीपी प्लांट अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे ऑडिट होणार असून हे ऑडिट महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मार्फतच होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्देश कदम यांनी केली आहे. सांडपाणी प्रक्रिया संदर्भातील नियमांना जे बगल देतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.
ठाण्यातील प्रदूषण आणि विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्देश कदम यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयाला भेट देऊन ठाण्यातील प्रदूषणाचा आढावा घेण्याबरोबरच विविध विषयांवर चर्चा केली. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह पालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे प्रसार माध्यमांसमोर ठेवले. ठाण्याच्या घनकचरा व्यवस्थापन विषयी बोलताना कदम म्हणाले,आज ठाण्यात ज्या पद्धतीने नागरीकरण होतंय, ज्या पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट होत आहे त्या पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन सुरु असल्याची समाधानकारक माहिती आपल्याला देण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले.
एअर कॉलिटी संदर्भात आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती देखील पालिकेने दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नियमाप्रमाणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मोठ मोठ्या गृहसंकुलामध्ये आहे कि नाही, त्याचे पाणी कुठे सोडले जाते हे महापालिकेकडून बघितले जात नाही. खरं ते पालिकेकडून परवानगी बांधकामांची परवानगी घेताना एसटीपी प्लांट बांधणे बंधनकारक आहे.
मात्र विकासक ते करत नाही. आणि त्यानंतर सोसायटीचे लोक राहायला येतात. त्यामुळे राज्यात जेवढे खाजगी एसटीपी प्लांट आहेत, त्यांचे आम्ही ऑडिट करणार आहोत असून ऑडिटमध्ये जी लोकं नियमांना बगल देतांना सापडतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे कदमयांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंगल प्लास्टिक बनवणाऱ्या कंपन्यांना करणार लक्ष
महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल लिस्ट प्लास्टिकला 100 टक्के बंदी आहे. त्याची अंमलबजावणी तंतोतंत कशी झाली पाहिजे, त्याच्यावर सुद्धा आम्ही कार्यपद्धती ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले. एक वेगळा सेल तयार करून आणि जे नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. प्लास्टिकच्या वापराबाबत एखाद्या नागरिकाला त्रास न देता जिथे तो बनतो जिथून पुरवठा होतो, जिथे साठवणूक होते त्यांच्यावर आमचा कारवाईचा फोकस असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तीन महिन्यांनी घेणार आढावा
यापुढे दर तीन महिन्याने आमच्या अधिकारी वर्ग आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी वर्ग हे नियमितपणे आढावा घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले. यांच्यातून नक्कीच पुढच्या पिढीला एक चांगलं ठाणे शहर असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोठ्या गृहसंकुलात कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक
ओला, सुका कचरा तसेच इ कचरा अशा तीन पद्धतीने कचरा सध्या गोळा केला जातो. कचरा वर्गीकरणाचा प्रश्न फक्त ठाण्यापुरताच नाही. त्यामुळे नागरिकांपर्यंत जनजागृती करणे आवश्यक आहे. जेवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्या स्तरावर कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मोठी गृहसंकुले कचऱ्यावर प्रक्रिया करतात का नाही यासंदर्भात महानगरपालिकेला आढावा घ्यायला सांगितले असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.