झेंडूची फुले नाबाद 100 pudhari photo
ठाणे

झेंडूची फुले नाबाद 100

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश केळुसकर

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागृत होणे, ही यशस्वीतेची प्राथमिक कसोटी असते. अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. केशवकुमार यांची परिटा येशील कधी परतून ही ओळ ऐकली की रेव्हरंड टिळकांची पाखरा येशील का परतून ही ओळ आठवते. शां. शं. रेग्यांचा ‌‘एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून‌’ हा चरण ऐकला की, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून... हा पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो.

खरं म्हणजे 1922 च्या मे महिन्यात आचार्य अत्रे यांनी झेंडूची फुले मधल्या विडंबन कविता लिहिल्या; पण ते हस्तलिखित बराच काळ त्यांच्याकडे तसंच पडून होतं. त्या कविता कोणाला वाचून दाखवण्याचं किंवा प्रसिद्ध करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. अखेर 1925 साली झेंडूची फुले प्रसिद्ध झाली आणि ही विडंबने बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाली.

झेंडूची फुले मधल्या सुरुवातीच्या कविता वाड्.मयीन आणि विशेषतः कवींच्या विश्वातील अपप्रवृत्तींना उघडे पाडण्यासाठी केशवकुमार अर्थात आचार्य अत्रे यांनी लिहिल्या आणि उत्तरार्धातील कविता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक नेते आणि पत्रकार या भूमिकेतून विरोधकांवर आक्रमक राजकीय हल्ले करण्यासाठी लिहिल्या. झेंडूच्या फुलांना तसा सुवास नसतो आणि त्यांचा रंगही तसा मोहक नसतो.

पण त्या फुलांच्या तळाशी देठापाशी जो पांढरा गर असतो तो खोबऱ्यासारखा खुसखुशीत गोड असतो. केशवकुमारांची ही काव्येही त्यातील मथितार्थ लक्षात आला की रसिकांना आजही गोड वाटतात. त्यांनीही रसिकांना, केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्यापरी खोबरे असं आवाहन करून ठेवलेलं आहे .

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आचार्य अत्रे यांच्यासारख्या एका प्रतिभावंताच्या झेंडूची फुले या विडंबन काव्यसंग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली, ही गोष्ट महाराष्ट्र सरकारलाही अभिमानास्पद वाटल्याने शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ठाण्यात आणि मुंबईत दोन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येत्या 25 मार्चला बुधवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 5 वाजता; तर 26 मार्च 2026 रोजी गुरुवारी शिवाजी मंदिर, दादर येथे संध्याकाळी 7 वाजता झेंडूची फुले हा कार्यक्रम सादर होईल.

या कार्यक्रमाची संहिता लिहिण्याची संधी मला मिळाली आहे. ज्येष्ठ भाष्य कविताकार रामदास फुटाणे, आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै आणि मी झेंडूची फुलेमधल्या काही कविता सादर करणार आहोत. फुटाणे आणि पै, अत्रेसाहेबांच्या आठवणीही सांगतील. तर विख्यात संगीतकार कौशल इनामदार यांनी सहा विडंबन कवितांना चाली दिल्या आहेत, त्या कार्यक्रमात सादर होतील.

आचार्य अत्रे यांचा आवाज, मराठामधील तत्कालीन हेडलाईन्स आणि अत्रे साहेबांचे दुर्मिळ फोटो यांचं दृकश्राव्य सादरीकरण सुद्धा होईल. दोन्ही कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत. ‌‘मराठी आठव दिवस‌’चे संस्थापक अध्यक्ष रजनीश राणे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागृत होणे, ही त्याच्या यशस्वीतेची प्राथमिक कसोटी असते.

अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. केशवकुमार यांची ‌‘परिटा येशील कधी परतून‌’ ही ओळ ऐकली की, रेव्हरंड टिळकांची पाखरा येशील का परतून ही ओळ आठवते. शां. शं. रेग्यांचा ‌‘एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून‌’ हा चरण ऐकला की, ‌‘एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून‌’ हा पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. मूळ कविता आणि तिची अनुकृती यातल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व तुलनेतून त्यांच्या आशयातील विसंगती जाणवून हसू येते.

कवी थोडे कवडे फार, हा प्रकार कुठल्याही काळी खराच असतो. संकेतांचं दास्य स्वीकारणारे किंवा चलनी फॅशनला बळी पडणारे पद्यकारच काव्य क्षेत्रात अधिक दिसतात. त्यामुळे बांडगूळवजा निरर्थक संकेतांची भरमसाट वाढ होऊ न मूळचा काव्यवृक्ष वठण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने संकेतांचा अतिरेक झाला की, विडंबनकाराला खाद्य मिळतं.

साहित्यक्षेत्रातील प्रथितयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, घाई वा निष्काळजीपणा यामुळे दोषास्पद बनतात. तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. साहित्यातले सनातनी मानकरी भूतकाळात भ्रमण करत असतात; तर नवे शिलेदार भविष्याच्या भुलभुलैय्याने वावड्या उडवीत हवेत तरंगत असतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यगामी वास्तवाची जाण विडंबनकार आणून देत असतो. जुन्यातल्या यांत्रिकतेची आणि नव्यातल्या विचित्रपणाची थट्टा त्यांच्यापैकीच पण किंचित तटस्थपणे पाहू शकणारा विडंबनकार करू लागतो आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो.

साध्या समीक्षात्मक टीकेपेक्षा विडंबनात्मक टीका अधिक प्रभावी आणि प्रखर असते. ज्याचे दात त्याच्याच घशात घालणं किंवा ज्याची बोटं त्याच्या डोळ्यात घालण्यासारखी ती असते. ती झोंबते कारण ती परोक्ष वर्णनात्मक नसून प्रत्यक्ष प्रत्ययात्मक असते. ती विषयाला बाहेरून भिडत नाही, तर विषयच टीकारूप बनून तिथं अवतरत असतो. झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी कोणत्याही काव्यप्रकाराला मिळालेली नाही. झेंडूच्या फुलांमुळे विडंबनाला मराठी वाङ्मयामध्ये स्वतंत्र स्थान मिळालं आणि त्या विषयावर त्या काळामध्ये अनेक विद्वानांनी विवेचनात्मक लेख लिहून चर्चा केली.

अनेक महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात या विडंबन काव्याचा शिरकाव झाला. ‌‘झेंडूची फुले‌’बाबत आपली भूमिका मांडताना आचार्य अत्रे म्हणतात, “काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व असल्यावाचून आणि काव्याच्या अंतरंगातल्या बारीक-सारीक मख्ख्यांचे मार्मिक ज्ञान असल्याखेरीज विडंबन काव्य लिहिता येणे अशक्य आहे. हे फारच थोड्यांना माहीत आहे. सर्कशीमध्ये विदूषक घोड्यावर बसण्याचे विडंबन करून जो हशा पिकवतो त्याचे एकच कारण म्हणजे तो स्वतः पट्टीचा घोडेस्वार असतो. स्वतः निर्दोष काव्य जो लिहू शकतो तोच दुसऱ्यांच्या काव्यामधल्या दोषांचे विडंबन करू शकेल किंवा त्यालाच तसे विडंबन करण्याचा अधिकार पोहोचतो.

तथापि विडंबनकाराच्या अंगात एवढाच गुण असून भागत नाही. त्याच्या अंगात तल्लख विनोदबुद्धी असेल, तरच त्याला प्रभावी विडंबने लिहिता येतील. विनोदबुद्धीच्या अभावी विनोदी काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो किती कृत्रिम आणि हास्यास्पद होतो, हे ज्याला पाहावयाचे असेल त्यांनी माधव जुलियन यांचे नकुलालंकार वाचून पाहावे.” शंभर वर्षानंतरही ‌‘झेंडूची फुले‌’ची लोकप्रियता आजही टिकून आहे आणि मराठी भाषेतील एक काव्यप्रकार 100 वर्षे टिकून राहतो याचा सर्व मराठी जनांना अभिमान आणि आनंद वाटतो, म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या 25 आणि 26 मार्चच्या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांची गर्दी होईल असं वाटतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT