डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकाजवळ अपघात pudhari photo
ठाणे

Dombivli Railway Crossing Accident: डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकाजवळ अपघात

रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे कामावरून घरी परतणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकाजवळ घडली आहे. या फाटकाजवळील धोकादायक खड्ड्यात पडून गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकाजवळून रमेश पाटील (55) हे मंगळवारी रात्री कामावरून घरी जात होते. फाटक ओलांडत असताना रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात त्यांचा पाय अडकला. इतक्यात या मार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या रेल्वेचा धक्का बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपात दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मोठागाव फाटकाजवळील या खड्ड्याची तक्रार करूनही रेल्वेने दुरूस्ती केली नाही. पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हा सरळ सरळ रेल्वेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप या भागातील संतप्त रहिवाशांनी केला. फाटक परिसरात पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास अपघातांचा धोका वाढल्याचेही घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झालेल्या रहिवाशांनी सांगितले.

या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. रेल्वे फाटक परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मृताच्या नातेवाईकांना मदतीचे आश्वासन

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. फाटक परिसरातील दुरूस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल. या घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल. मृताच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तर दुसरीकडे मोठागाव फाटकाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे फाटक परिसरात रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि अपुऱ्या सुविधांमुळे परिसरातील रहिवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT