

डोंबिवली : आपत्कालीन परिस्थितीत रूग्ण, अपघातग्रस्त, गर्भवती महिलांसाठी देवदूत ठरणारी यंत्रणा म्हणून 108 क्रमांकाचा वापर केला जातो. मात्र ही यंत्रणा फोल ठरल्याची घटना कल्याणकारांना अनुभवायला मिळाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात रूग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मेवालाल गुप्ता (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कल्याण स्टेशन परिसरात प्रकृती बिघडल्यानंतर 108 क्रमांकावर कॉल करून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र रुग्णवाहिका तब्बल 40 मिनिटे उशिरा आली, तोपर्यंत रूग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलजवळ एका अनोळखी पादचाऱ्याला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. या पादचाऱ्याने स्वतः 108 क्रमांकाच्या आपत्कालीन सेवेला फोन करून रूग्णवाहिकेची मागणी केली. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे पाहून स्थानिक रविवाश्यांनीही वारंवार 108 वर संपर्क साधला. तरीही रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 40 मिनिटांचा विलंब झाला.
सदर रूग्णवाहिकेमध्ये डॉक्टर देखिल नव्हता. विशेष म्हणजे दीपक हॉटेल ते रूक्मिणीबाई हॉस्पिटल हे अंतर अवघे 3 मिनिटांचे असतानाही रूग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने सदर पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात मोठा गोंधळ घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत मदत मिळाली असती तर त्या पादचाऱ्याचा जीव वाचला असता, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे 108 क्रमांकाच्या आपत्कालीन सेवांच्या कार्यपद्धतीवर आणि केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पूर्वी देखील केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयातील निष्काळजीपणाचा अनेक घटना समोर आले आहे.
वेळेत पोहोचल्याचा दावा?
या प्रकरणात 108 क्रकांकाच्या रूग्णवाहिकेवरील डॉ. मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर केवळ 12 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झालेला होता. तसेच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांकडून हल्ला होण्याची भीती निर्माण झाल्याने तेथून निघून जावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही, असा दावा डॉ. तोफिक आणि चालक चोरगे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केला.