डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या आधारवाडी कारागृहाच्या स्वयंपाकघरात मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये दोघे कैदी होरपळल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या एफएसएल पथकाने तपास हाती घेतला आहे. आगीचे नेमके कारण गॅस गळती आहे की आणखी काही? याचा छडा लावण्यासाठी एफएसएलच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात कारागृह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाच्या दरम्यान कारागृहातील सर्व कैद्यांसाठी स्वयंपाक करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी आसीफ सैंदू (३८) आणि अफजल गाझी (३०) हे दोन कैदी जेवण करत होते. स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच यातील एका कैद्याच्या अंगावर असलेल्या कपड्याचा भाग हा चुकून गॅस सिलिंडरच्या कॉकमध्ये अडकून गेला. त्यामुळे काही क्षणांच्या आत गॅसची फ्लेम अनियंत्रित होऊन वाढली आणि आगीचा भोठा भडका उडाला.
आगीच्या भडक्यात आसीफ आणि अफजल हे दोघेही गंभीररित्या होरपळले गेले. घटना घडताच कारागृहातील अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि तेथील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कैद्यांना तातडीने उल्हासगनरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने दोघांना मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर कारागृह प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासात स्वयंपाकघरातील पेटत्या गॅसशी संपर्क आल्याने दोघे कैदी होरपळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तथापि कारागृहातील सुरक्षा आणि आगीचे नेमके कारण याबाबत शंका असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एफएसएल पथकाला पाचारण करण्यात आले.
एफएसएल पथकाने स्वयंपाकघरातील जळालेल्या साहित्यासह गॅस पाईपलाईनचे आणि सिलिंडरचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच आग लागण्यापूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. कारागृहातील इतर कैदी आणि स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदविले जाणार आहेत.
एफएसएलच्या अहवालाकडे लक्ष
एफएसएलचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणताही अंदाज बांधणे योग्य होणार नाही. स्वयंपाकाचे काम तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. स्वयंपाकघर सील करण्यात आल्याचे कारागृह सूत्रांकडून सांगण्यात आले. आधारवाडी कारागृहातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वीही सुरक्षेच्या मुद्द्यावरून कारागृह प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे एफएसएलच्या अहवालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.