Kalyan Aadharwadi prison violence
डोंबिवली : कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. या कारागृहातील एका माथेफिरू कैद्याने अन्य कैद्याशी बोलू दिले नाही, या कारणामुळे शिवीगाळ करत कर्तव्यावरील हवालदारावर दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला. जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे गैरकृत्य केल्याच्या आरोपाखाली सदर हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी कैद्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर (वय ३०) असे आधारवाडी कारागृहात धिंगाणा घालणाऱ्या कैद्याचे नाव आहे. एका गुन्ह्याच्या खटल्यात हितेंद्र ठाकूर आधारवाडी कारागृहात आहे. हवालदार प्रभू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलिसांनी कारागृहात दंगामस्ती, शिवीगाळ, दमदाटी, दगडफेक करणाऱ्या हितेंद्र ठाकूर याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार प्रभू चव्हाण बुधवारी आधारवाडी कारागृहामध्ये असलेल्या सर्कल सहा येथे कर्तव्यावर होते. तेथील कैदी हितेंद्र ठाकूर याने अन्य न्यायबंदी सुनीलसिंग धारासिंग लभाना याला आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी पाठवा, अशी मागणी हवालदार प्रभू चव्हाण यांच्याकडे केली. मात्र हा प्रकार नियमबाह्य आणि गैरवर्तणुकीचा असल्याने हवालदार प्रभू चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर याची सूचना मान्य करण्यास इन्कार केला. कैदी सुनील सिंगला हितेंद्रकडे गप्पा मारण्यासाठी हवालदाराने सोडले नाही. हवालदार चव्हाण आपले ऐकत नसल्याचे पाहून कैदी हितेंद्र ठाकूर पिसाळला. त्याने हवालदार चव्हाण यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी करून त्यांच्या जीवाला धोका होईल, असे कृत्य केले. या घटनेनंतर सर्कल सहा परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते.
हवालदार चव्हाण हे हितेंद्र ठाकूरला शांत राहण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र कैदी हितेंद्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. कैद्याने जवळच पडलेला दगड आणि सिमेंटचा तुकडा उचलून हवालदार चव्हाण यांच्या दिशेने भिरकावला. कैदी हितेंद्र ठाकूर पिसाळल्याचे लक्षात येताच हवालदार चव्हाण यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन हितेंद्रला रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. यावेळी झालेल्या झटापटीत हवालदार प्रभू चव्हाण यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी हवालदार प्रभू चव्हाण यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिस उपनिरीक्षक बी. बी. गव्हाणे यांना दिले.
पूर्वी कारागृहात मोबाईल फोन, विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू आढळून आल्या होत्या. या कारागृहातून कैद्यांचा बाहेरील जगताशी थेट संपर्क साधला जात असल्याचा अनेक घटना या कारागृहात सापडल्या जाणाऱ्या मोबाईल सेटवरून उघडकीस आल्या आहेत. नामचीन गुंड-गुन्हेगार मंडळींचा या कारागृहात मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. या कारागृहामधील भाई लोक चक्क मोबाईलचा सर्रास वापर करताना अनेकदा आढळून आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
या कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता ५४० इतकी असताना आजमितीला कारागृहात जवळपास १४०० कैदी आहेत. क्षमतेपेक्षाही तिप्पट कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कैद्यांमध्ये वारंवार वाद होत असतात. घुसमट होत असल्याने या कैद्यांत वाद होतात आणि राग तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांऱ्यांवर काढला जात असल्याच्या घटना यापूर्वी बऱ्याचदा घडल्या आहेत. कारागृह ओव्हरलोड झाल्याने नव्याने येणार्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जाते. त्याचबरोबर कारागृहाची दुरूस्ती आणि विस्तारीकरणाचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने कारागृह प्रशासनाला कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नवी मुंबईतील तळोजा, ठाण्यातील मध्यवर्ती, मुंबईतील आर्थर रोड आणि कल्याणातील आधारवाडी अशी चार मोठी कारागृहे आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, शहापूर, मुरबाड, आदी परिसरातील गुन्ह्यांच्या घटनांसह कैद्यांची संख्या देखिल वाढत आहे. काही प्रकरणांत कैद्यांना जामीन होत नाही, तर काहींना जामीन देण्यासाठी कुणीही नसतो. त्यांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असते. असे कैदीही या कारागृहात गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडले आहेत. आधारवाडी कारगृहाची क्षमता वाढविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. सरकारदरबारी त्याला अजूनही यश मिळालेले नाही. कैद्यांच्या तुलनेत प्रसाधनगृह आणि बरॅक्सची संख्या कमी पडत असल्याने त्यांची वारंवार दुरूस्तीही करावी लागत आहे.