डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण स्टेशन परिसरात पिलर क्रमांक १३ चे काम सुरू असताना एका कामगाराचा पडून मृत्यू झाल्याची घटना कल्याण येथे घडली. यासंदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. पिंटू राधेश्याम कुशवाह (वय ३१) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहे.
कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण गेस्ट हाऊससमोर पिलर क्रमांक १३ चे बांधकाम सुरू आहे. पिंटू राधेश्याम कुशवाह हा आज कामावर असताना त्याच्या हातातील टेप खाली पडली. यानंतर तो टेप आणण्यासाठी बांधकामासाठी लावलेल्या जाळीवरून चालत जात होता. मात्र, ही जाळी फाटलेली असल्याने पिंटूचा तोल गेला आणि तो जवळपास १५ ते २० फुट उंचीवरून खाली कोसळला. यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान पिंटूच्या मृत्यूस ठेकेदार प्रेम शंकर सुंदर प्रसाद मिस्त्री हे जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून त्यांच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.
हेही वाचा :