Bangladeshi Citizens arrested in Ambernath
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
सृष्टीहिल या गृह संकुलात एका फ्लॅटमध्ये १४ जणांचं कुटुंब राहत होतं. दरम्यान अंबरनाथ पोलीस पथकाला एका गुप्त माहितीद्वारे हे कुटुंब अवैधरित्या भारतात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून ५ पुरुष आणि ४ महिला बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. शिवाय या कुटुंबासोबत ५ लहान मुलं देखील आहेत.
हे सगळं कुटुंब कोणतीही वैद्य कागदपत्र नसताना भारतात अवैधरित्या वास्तव्य करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान या कुटुंबाला भारतात राहण्यासाठी कोणी मदत केली. त्यांना भाड्याने कोणी घर घेऊन दिलं, याचा तपास करून पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.
तर अंबरनाथमध्ये एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच अंबरनाथ शहर हे बांगलादेशी नागरिकांचं आश्रयस्थान झालं तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राने राज्यांना पाकिस्तानी नागरिकांना भारतातून पाकिस्तानला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यांकडून पाकिस्तानातून आपल्या राज्यात विविध कारणांनी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेतला जात आहे. त्यातच इतक्या मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक अंबरनाथमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना मदत करणाऱ्यांचा पोलिस शोध घेणार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.