भाईंदर : अवघ्या महाराष्ट्रातील प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठूरायाची 51 फुटी भव्य मूर्ती मिरा-भाईंदरमध्ये साकारण्यात येत आहे. या मूर्तीचे अनावरण रविवारी, 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. श्री विठूरायाची भव्य मूर्ती ठाण्याप्रमाणेच मिरा-भाईंदरमध्ये सुद्धा साकारण्यात यावी, अशी संकल्पना सरनाईक यांनी मांडली होती आणि हि संकल्पना येत्या 30 नोव्हेंबरला पूर्णत्वास जाणार आहे.
मूर्तीच्या अनावरण पूर्वी भाईंदर पूर्वेकडील गोडदेव गाव परिसरात असलेले विठ्ठल मंदिर ते नवघर तलाव दरम्यान भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन सांयकाळी 6 वाजता करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यानंतर श्री विठूरायाच्या 51 फुटी भव्य मूर्तीचे सायंकाळी 7 वाजता भाईंदर पूर्वेच्या नवघर नाका येथील; शंकर नारायण महाविद्यालयासमोरील स्व. शामराव पाटील उद्यानात अनावरण करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरु असून हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी प्रत्येक विठ्ठल भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.