ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे, १४५ पाड्यांची तहान भागते टँकरवर  pudhari photo
ठाणे

Thane Water Crisis : ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे, १४५ पाड्यांची तहान भागते टँकरवर

अहवालानुसार ९९ हजार ३९७ नागरिकांना ४५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले असून तब्बल ४४ गावे आणि १४५ पाड्यांतील जवळपास एक लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८ जून २०२६ अखेरच्या अहवालानुसार ९९ हजार ३९७ नागरिकांना ४५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील परिस्थितीची तीव्रता शहापूर तालुक्यात सर्वाधिक दिसून येत आहे. येथे ३८ गावे आणि १३५ पाडे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले असून ९३ हजार ७३१ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ४२ खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे चित्र आहे.

मुरबाड तालुक्यातही ६ गावे आणि १० पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून ५ हजार ६६६ नागरिकांसाठी केवळ तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांना आजही पर्यायी आणि शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जवळपास एक लाख नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत ११० बोअरवेलची कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणावर नागरिक अद्याप टँकरवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कितपत प्रभावी ठरत आहेत, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले. मात्र, जिल्ह्यातील ४४ गावे आणि १४५ पाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीप्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT