Gun  Pudhari
ठाणे

Badlapur News: बदलापूर हादरले! क्रिकेट टर्फवर 23 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; नेमकं घडलं काय?

फार्महाऊस परिसरातील क्रिकेट टर्फवर ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा मृत्यू आत्महत्या, अपघात की घातपात, याचा सर्वंकष तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर: बदलापूरजवळील सागाव येथे शनिवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत छातीत गोळी लागून २३ वर्षीय भुवन कृष्णा पाटील याचा मृत्यू झाला. फार्महाऊस परिसरातील क्रिकेट टर्फवर ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा मृत्यू आत्महत्या, अपघात की घातपात, याचा सर्वंकष तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुवन कृष्णा पाटील याचे सागाव येथे स्वतःचे क्रिकेट टर्फ असून, शनिवारी रात्री तो नेहमीप्रमाणे टर्फ परिसरात होता. त्याचदरम्यान त्याच्या छातीत गोळी लागली. गोळी लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

काही वेळाने त्याचा मृतदेह फार्महाऊसच्या लॉनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भुवन पाटील याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली का, त्याच्याकडून चुकून गोळीबार झाला का, अथवा हा घातपाताचा प्रकार आहे का, या सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली.

या घटनेने सागाव आणि बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या ग्रामीण पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT