16 ton beef container seized in Thane 
ठाणे

16 ton beef container seized in Thane| उत्तर प्रदेशातून ठाण्यात आलेला तब्बल १६ टन गोमांसाचा कंटेनर शिताफीने पकडला

16 ton beef container seized in Thane - हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : उत्तर प्रदेशातून ठाणे जिल्ह्यात आणण्यात आलेला तब्बल १६.८ टन गोमांसाचा कंटेनर गोरक्षकांनी शुक्रवारी पहाटे अंबरनाथ तालुक्यात पकडला आहे. खोणी-तळोजा महामार्गावरून संशयास्पदरीत्या मार्ग बदलत जाणाऱ्या या कंटेनरवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवले होते. अखेर नाऱ्हेण ते उसाटणे परिसरात कंटेनर अडवून त्याची पोलिसांच्या उपस्थितीत तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांस आढळून आले आहे. त्यानंतर आता उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातून आलेला हा कंटेनर नवी मुंबईच्या दिशेने जात होता. त्यानंतर त्याचे लोकेशन वारंवार बदलत असल्याने गोरक्षकांच्या पथकाला संशय आला. विशेष म्हणजे कोल्ड स्टोरेज असलेल्या या कंटेनरमधून खाली लाल रंगाचा पाणी पडत होता. त्यामुळे कंटेनरवर नजर ठेवण्यात आली होती.

कंटेनर खोणी - तळोजा महामार्गावरून उसाटणे परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून तो अडविला होता. त्या कंटेनरमध्ये सुमारे १६.८ टन मांस असल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली असूनवजन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंटेनरमधील मांस खोणी तळोजा महामार्गावरील एका वेअरहाऊसमधील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित वेअरहाऊस हे एका आमदाराच्या कंपनीच्या अंतर्गत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खळबळ उडाली आहे. मात्र या दाव्याची अधिकृत पोलिसांकडून अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये हे मांस ठेवण्यासाठी जाणार होता त्याच्याकडे आता हिंदुत्ववादी संघटनांनी नजर ठेवली आहे. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

कंटेनरही हिललाईन पोलिसांच्या ताब्यात असून तो नेवाळी चौकीच्या आवारात आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मांसाची तपासणी केल्यानंतर त्याचा नेमका प्रकार स्पष्ट होणार आहे.

ठाणे रायगड जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गो-रक्षकांनी केलेल्या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर हे मांस कोणत्या कंपनीसाठी जाणार होते? यामागील सूत्रधार कोण आहेत? याची स्थानिक पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT