ठाणे : महापालिकेंच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर ठाणे पालिकेने आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार आपल्या हक्काचा नगरसेवक निवडणार आहेत. ठाणे पालिका हद्दीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 4 लाख मतदार वाढले आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वत्र जास्त म्हणजेच 66 हजार 115 मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये 40 हजार 790 सर्वात कमी मतदार आहेत.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्याने गेल्या म्हणजेच 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेने अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पुर्ण करण्यात आली आहे.