

ठाणे : अपुरे रस्ते, खड्डे आणि सतत सुरू असलेली विकासकामे आदी कारणांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे. त्यातच भर रस्त्यात बंद पडणारी अवजड आणि हलकी वाहने देखील वाट रोखून धरतात आणि वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मागील वर्षभराच्या कालावधीत 2 हजार 79 नादुरुस्त वाहने रस्त्यातच बंद पडल्याच्या घटना घटना घडल्या आहेत. ही बंद वाहने क्रेनद्वारे टोईंग करावी लागली आहेत. वर्षभरात नऊ उपविभागात वाहने बंद पडल्याचे एकूण 2 हजार 754 तक्रार कॉल वाहतूक विभागाकडे करण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
मुंबई पाठोपाठ वेगाने विकसीत होत असलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या नागरिकरणासोबतच वाहनांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. वाहनांच्या तुलनेने दळवळणासाठी रस्ते अपुरे आहेत. त्यातच रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि मेट्रो तसेच, रस्ते रुंदीकरण व अन्य विकासकामांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अशातच भर रस्त्यात बंद पडणाऱ्या तसेच अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे, वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच बंद पडलेली ब्रेकडाऊन वाहने उचलण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असते.
यासोबतच ऊन, वारा, पावसात अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाट करून देताना पोलिसांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. 1 जानेवारी 2025 ते 12 डिसेंबर 2025 या वर्षभराच्या कालावधीत नऊ उपविभागात वाहने बंद पडल्याच्या 2 हजार 754 तक्रारी फोन द्वारे करण्यात आल्या आहेत. तर एकूण 2 हजार 79 वाहने क्रेनद्वारे टोईंग करण्यात आली आहेत. ह्यात 1 हजार 847 ट्रक व मल्टीएक्सल वाहने असून 232 बसेसचा समावेश आहे. वाहतूक शाखेकडे स्वतःची क्रेन सुविधा उपलब्ध नसल्याने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून क्रेन सुविधा उपलब्ध केली जाते अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
दरम्यान, अनेकदा अपघातांमुळे वाहने ब्रेक डाऊन होत असली तरी वाहने बंद पडण्यास इतर कारणेही आहेत. जसे रस्त्यावर किंवा महामार्गावर इंधन संपल्याने, प्रेशर पाईप तुटून किंवा क्लचप्लेट उडाल्यामुळे 10 टक्के वाहने बंद पडतात. तर, टायर फुटण्याच्या प्रकारामुळे 5 टक्के वाहने बंद पडतात. तेव्हा, वाहन मालक आणि विशेषतः चालकांनी वाहतुकीसाठी निघण्यापूर्वी वाहनांच्या सक्षमतेबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. वाहनांची देखभाल - दुरुस्ती वेळोवेळी करण्यासह वेगावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. टायरमधील हवेचे प्रमाण आणि टायरची सद्यस्थिती पडताळूनच वाहने हाकावीत. तसेच, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड भार वाहू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.