Ashok Kharat CDR leak Maharashtra politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) प्रकरणावरून गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्यातील तपास यंत्रणांवर थेट निशाणा साधला आहे.
अंधारे यांनी स्पष्टपणे म्हटले की, अशोक खरात यांचा CDR अधिकृतपणे एसआयटीने काढलेला नसताना तो बाहेर कसा आला, हा अत्यंत गंभीर ‘प्रायव्हसी ब्रीच’ आहे. त्यामुळे ज्यांनी हा CDR बाहेर काढला, त्या अंजली दमानिया यांच्यावर कारवाई व्हावीच, पण त्याचवेळी या CDRमध्ये ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यांची चौकशी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले असल्याचा दावा करत अंधारे यांनी विचारले की, “SIT इतकी धीमी का आहे? मोठ्या नावांमुळे चौकशी टाळली जाते आहे का?”
अंधारे यांच्या मते, या प्रकरणात केवळ CDR लीक होणे हा मुद्दा नसून, त्यामागील संभाषण आणि संपर्क यांचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, खरात यांना काही व्यक्तींनी वारंवार कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात काही राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील मोठी नावे असल्याचा त्यांचा दावा आहे.
याचवेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित करत, “या प्रकरणातील विविध कड्या जोडणारे व्यक्ती कोण आहेत, हे SITने स्पष्ट करावे,” अशी मागणी केली. दीपक लोंढे या व्यक्तीच्या माध्यमातून काही संबंध जोडले जात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
अंधारे यांनी तपासाच्या गतीवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “जर काही माहिती आम्हाला आणि बाहेरील व्यक्तींना मिळू शकते, तर तीच माहिती SITपर्यंत का पोहोचत नाही?” यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर, रुपाली चाकणकर, नामकरण आवारे, ललित पोकळे यांसारख्या व्यक्तींना अद्याप चौकशीसाठी का बोलावले गेले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती SITला दिली असूनही त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात ‘अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि वर्षा बंगल्यावर घडलेल्या कथित घटनां’बाबत सुरू असलेल्या चर्चांचा उल्लेख करत अंधारे यांनी म्हटले की, “जर अशा गंभीर गोष्टी घडल्या असतील, तर त्याचा तपास होणे गरजेचे आहे. कोणाला याचा फायदा होतोय, हे समोर आले पाहिजे.” CDR लीक प्रकरणाने आता केवळ कायदेशीरच नाही तर राजकीय वादाचे रूप घेतले असून, SIT पुढे काय पावले उचलते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.