Bitergaon Woman Death
करमाळा : सध्या जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांची उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी धडपड चालू आहे. ही धडपड एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. विंधन विहिरीतील विद्युतपंप काढताना महिलेच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला. मनीषा नितीन मुरूमकर (वय ३४, रा. बिटरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना ५ मे रोजी घडली होती. महिलेचा उपचारादरम्यान आज (दि.९) मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनीषा मुरूमकर पती नितीन मुरूमकर व लहान मुलगा यांच्याबरोबर सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेतात विंधन विहिरीतील विद्युतपंप काढण्यासाठी गेल्या होत्या. विद्युतपंप काढताना विंधन विहिरीजवळ लोखंडी अथवा पाण्याची टिप (बॅरल) मांडून त्यावरून दावे ट्रॅक्टरला बांधून विद्युत पंप सहज खेचून काढता येतो. असे करताना दोरीने पंप ओढायचा प्रयत्न सुरु असताना दावे अचानक तुटले. त्यातील आडवे बांधलेले लाकूड वेगाने येऊन मनीषा यांच्या डोक्याला लागले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तत्काळ माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, वैभव मुरूमकर, मधुकर शिर्के, भाऊसाहेब बाबर, गणेश बाबर आदींनी करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असताना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनिषा हिच्या पश्चात दोन मुले, मुलगी, पती, सासू व सासरे असा परिवार आहे. बिटरगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरूमकर यांच्या त्या सून व पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या त्या भावजयी होत.