Vitthal's VIP darshan closed
विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद Pudhari File Photo
सोलापूर

विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रा एकादशीच्या मुख्य सोहळ्याला आणखी 10 दिवसांचा अवधी आहे. असे असताना रविवारी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथील दहाव्या पत्राशेडमध्ये गेली. दर्शनाला तासन्तास अवधी लागत असल्याने घुसखोरी करून दर्शन घेणार्‍या व्हीआयपींना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा, अशी संतप्त भावना रांगेतील भाविकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याची दखल घेऊन मंदिर प्रशासनाने रविवारपासून व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

आषाढी यात्रेनिमित्त रविवार, दि. 7 पासून विठ्ठल-रुक्मिणीचा पलंग निघाला आहे. भाविकांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे 24 तास दर्शन सुरू झाले आहे. सकाळी 6 पासून दर्शन रांगेत उभारलेले भाविक तासन्तास बसलेले भाविक अजूनही गोपाळपूर पत्राशेडमध्येच असल्याने भाविक संतप्त होऊ लागले आहेत.

मंदिर परिसरात तथाकथित व्हीआयपी लोकांचे लोंढे कोणाची तरी ओळख काढत झटपट दर्शनासाठी घुसखोरी करीत आहेत. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना तसेच ताटकळत थांबावे लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात वृद्ध आणि लहान मुले असल्याने या भाविकांनी आता आषाढी वारी होईपर्यंत कोणत्याच व्हीआयपी मंडळींना दर्शनासाठीमधून सोडू नका, अशी मागणी केली आहे. आम्ही आमचे शेत, घरदार सोडून इथे देवाच्या दर्शनासाठी आलो, तर मग देवाच्या दारात हा भेदभाव कशाला हवा, असा सवाल हे संतप्त भाविक करू लागले आहेत. यात महिलाही असून तुमच्या व्हीआयपींना आमच्यासारखे रांगेत पाठवा, अशा भाषेत मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.

मंदिर समितीकडून व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे सांगितले जात असले तरी मंदिराच्या विविध दारातून या तथाकथित व्हीआयपींची गर्दी हटायला तयार नाही. त्यामुळेच दर्शन रांगेतील गोरगरीब भाविक मात्र तसाच रांगेत ताटकळत उभा आहे. याचा सगळा रोष प्रशासनावर काढण्यास भाविकांनी सुरुवात केली आहे. किमान आतातरी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सक्त सूचना कराव्यात, आषाढी यात्रा संपेपर्यंत कोणत्याही बड्या भाविकांना घुसखोरी करून दर्शन देऊ नका अशी ताकीद दिल्यास आषाढीच्या या गोरगरीब भाविकांना वेळेत दर्शन मिळू शकेल.अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत.

दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रविवार, दि. 7 पासून 24 तास ‘श्रीं’चे दर्शन खुले राहणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.
ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, मंदिर समिती पंढरपूर
SCROLL FOR NEXT