पंढरपूर : लाखो वैष्णवांचे आराध्य दैवत असणार्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होऊ लागली आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून झीज होत असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप (एपॉक्सी लेप) करण्यासाठी मंदिर समितीकडून शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे अहवाल पाठवून परवानगी मागीतली आहे. परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. वर्षभरातील मोठ्या चार यात्रांना लाखो भाविक येतात. भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन घेतात. त्यामुळे मूर्तीची झीज होत आहे. विठ्ठल मूर्ती ही स्वयंभू समजली जाते. याच विठ्ठल मूर्तीच्या चरणांची सध्या झीज होत आहे.
याबाबत काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी विठ्ठल मूर्तीची सखोल पाहणी केली. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला याबाबतचा अहवाल दिला आहे.
यापूर्वी जुलै 2020 मध्ये मूर्तीचे लेपन
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल मूर्तीवर कोरोना काळात जुलै 2020 रोजी मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी लेपन करण्यात आले होते. विठ्ठलाच्या मूर्तीवर सर्वप्रथम 1988 मध्ये लेपण झाले. यानंतर 2005 , 2012 आणि 2020 साली वज्रलेप करण्यात आला.