सोलापूर : शहर आणि जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेली शहरातील भैया चौकातील रेल्वेचा ब्रिटिशकालीन ओव्हर ब्रिजच्या प्रत्यक्ष पाडकामाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. चार तासांत ब्रिटिशकालीन पूल सुरक्षितपणे पाडण्यात आला. सकाळी 8.30 ते 10.30 पर्यंत रेल्वेची विद्युत वाहिनी खाली उतरवली. त्यानंतर पुलावरील पूर्ण मलबा जेसीबीने काढला. त्यानंतर तीन पोकलेनच्या ब्रेकरने लोखंडी गर्डरवरील भराव फोडण्याच्या कामाला प्रारंभ केला. तसेच लोखंडी गर्डर गॅस कटरने कटिंगही सुरू केले.
एनजी मिलच्या बाजूकडील भैया चौकाच्या दिशेचा पहिला लोखंडी गर्डर दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी क्रेनने उचलला व बाजूच्या मोकळ्या जागेत ठेवला. त्यानंतर मरीआई चौकाकडील त्याच बाजूचा लोखंडी दुसरा गर्डर दुपारी 1.53 मिनिटांनी उचलला, तर तिसरा गर्डर उचलण्यास सव्वादोन, तर शेवटचा गर्डर 4 वाजून 7 मिनिटाला बाजूला करण्यात आला. चार तासांत ब्रिटिशकालीन पूल सुरक्षितपणे पाडण्यात आला.
सकाळच्या सत्रात कलबुर्गी -कोल्हापूर ही रेल्वे सकाळी 8.25 वाजता येथून सुटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम पुलाच्या खालील विद्युत वाहिनी काढून ती खाली पटरीवर ठेवण्यात आली. त्यानंतर पटरीच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भराव भरून ठेवण्यात आले. पटरीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, यासाठी त्यावर प्लायवूड ठेवण्यात आले. त्यानंतर जेसीबीने मलमा काढण्यात आले. हा सर्व मलमा प्लायवूडवर पडले. यामुळे ती प्लायवूडवर पडलेला मलबा वेळेत काढता यावे, यासाठी प्लायवूड टाकले होते. जेसीबीनेच जास्तीत मलबा काढण्यात आला. मग, तीन पोकलेनच्या ब्रेकरने गर्डरवरील मलबा फोडण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
पहिला गर्डर सुरक्षितपणे उचलला
एकीकडे तीन पोकलेनच्या ब्रेकरने पूल फोडण्याचे सुरू असतानाच दुसरीकडे गॅस कटरने गर्डर कापणेही सुरूच होते. याचवेळी भैया चौकाच्या दिशेला उभी केलेल्या क्रेनने एका गर्डरला हुकने बांधण्यात आले. दोन्ही बाजूच्या गर्डरचे गॅसने कटिंग केल्यावर दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी पहिला गर्डर सुरक्षितपणे उचलण्यात यश आले. पुलावरील शेवटचा गर्डर हा 4 वाजून 7 मिनिटांनी उचलला. हा पूल पाडायला ठेकेदारासह प्रशासनाला साडेचार तासांचा वेळ लागला.