Uncle killed by Nephews Solapur Crime News
करमाळा: अर्जुननगर (ता. करमाळा) येथे दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचा शेतातील बांधाच्या कारणावरून सतत वाद करतो, म्हणून धारदार शस्त्राने भोसकून खून केला. करमाळा पोलिसांनी याप्रकरणी दोघा पुतण्यांना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.७ ) सकाळी दहाच्या सुमारास घडली. बार्शी सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तात्याबा बाबुराव रोकडे (वय ४०) व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे (वय ३५, दोघेही रा. अर्जुननगर ता.करमाळा) अशी संशयितांची नावे आहेत. भुजंग सावळा रोकडे (वय ६५, रा. अर्जुननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा मुलगा सतीश भुजंग रोकडे (वय ४०) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत भुजंग रोकडे यांची शेती अर्जुन नगर येथे आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या पुतण्यांची शेती आहे. व त्यांच्या शेजारी भुजंग रोकडे यांच्या जावई राजेंद्र घाडगे (गट न.३६) यांची शेती आहे. जावयाच्या व पुतण्याच्या शेताच्या सामाईक बांधावरील लिंबाचे झाड तोडण्याचे काम चालू होते. त्याच्या फांद्या त्याच्या चारीत टाकण्यात आल्या होत्या. याची माहिती भुजंग रोकडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन हरकत घेतली व या चारीतील लिंबाचे फाटे काढून टाका, असे त्यांनी पुतण्याला सांगितले.
यावरून पुतण्यांनी त्यांच्याशी वाद घालून 'तुझा या ठिकाणी बोलण्याचा संबंध नाही' असे सांगून प्रथम शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने बरगडीच्या डाव्या बाजूला भोसकले. यावेळी ते बेशुद्ध होऊन खाली पडले. तेथील नागरिकांनी त्यांना सतीश रोकडे यांच्या वाहनातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी करमाळा पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना बार्शी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे पुढील तपास करीत आहेत.