

Private Bus Overturns Adhegaon
टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे आढेगाव शिवारात साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच.४८-के-१९८१) उलटली. या अपघातात ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १७ ते १८ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज (दि.५) पहाटे ३.५१ च्या सुमारास घडली. अहमदपूर (लातूर) येथून पुणे येथे ही बस जात होती. अपघात होताच चालक पसार झाला.
चालकास डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पुरुषोत्तम धापटे, हायवे पेट्रोलिंग पोलीस अंमलदार पवार, इंगोले, अपघात पथकाचे सरडे, पोलीस मित्र कदम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सूचना दिल्या. गंभीर ३ व इतर सर्व जखमींना टेंभुर्णीतील खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते.