पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा : एका तरुणाच्या घरातून १ लाख रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल जप्त केले. ही कारवाई सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोहोळ शहरातील बागवान नगर परिसरात आज (दि.७) सकाळी ८.४० सुमारास केली. याप्रकरणी साहिल इक्बाल बागवान (रा. बागवान नगर, कुरूल रोड, मोहोळ), सुरज खंडू जाधव (रा. यावली, ता. मोहोळ), सद्दाम रशीद शेख (रा. विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ) या तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज जाधव याला मोहोळ - सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडवर गुंड शॉपींग मार्टच्या शेजारील मैदानात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडे पिस्टलबाबत चौकशी केली असता त्याने साहील बागवान याने तीन महिन्यांपूर्वी २ देशी बनावटीचे पिस्टल माझ्याकडे दिले होते. त्यानंतर पिस्टल पुन्हा साहील बागवान याला दिले होते. पोलिसांनी साहिल बागवान याच्याकडे पिस्टल बाबत अधिक चौकशी केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने घरातील किचनच्या रॅकमध्ये स्टीलच्या डब्यातून देशी बनावटीचे दोन पिस्टल मॅगझीनसह काढून दिले. त्यानंतर त्याने हे पिस्टल सद्दाम रशीद शेख (रा. विरखडे बुद्रुक, ता. मोहोळ) याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले.
पिस्टल हे सुरज जाधव व साहिल बागवान या दोघांनी विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी साहिल बागवान व सुरज जाधव, सद्दाम शेख या तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात विनापरवाना दोन गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी यांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
ही कारवाई सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्रकाश कारटकर, अजय वाघमारे, राहुल दोरकर, अन्दर अत्तार, हरिदास थोरात, सुनिल पवार यांच्या पथकाने केली.