

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांकडून जिल्हयात अवैधरीत्या गावठी दारु प्रकरणी १५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये २७ वाहने व गावठी दारूसह ८२ लाख २४ हजार ५६७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज (दि.६) राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व दुय्यम निरीक्षक कुर्डुवाडी पथकांच्या संयुक्त धडक कारवाईमध्ये बार्शी शेळगांव रोड (ता.बार्शी) येथे मंगळवारी (दि.६) रात्री पिकअप (क्र. एम.एच.१३ डीक्यू ४१२७) वाहनासह ९०० लीटर गावठी दारू असा ९०० लीटर एकूण ८ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर कारवाई करण्यात आली. तसेच घोडा तांडा, भोजाप्पा तांडा, व सोलापूर शहर परिसरात केलेल्या अवैध गावठी दारू निर्मिती केंद्रावर वाहतूक करणा-या वाहनांवर केलेल्या कारवाईत हातभट्टी दारू, दोन चारचाकी वाहनांसह १२ लाख ७७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकुण सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून सोलापूर जिल्हयात एकूण १५९ गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण २७ वाहनांसह ८२ लाख २४ हजार ५६७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरी भागात नियम भंग करणाऱ्या बिअर शॉपीवर कारवाई करण्यात आली. अवैध दारुबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटसॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.