मोहोळ : टेम्पोच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन मैत्रिणींचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावच्या हद्दीत घडली. टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कॉलेजला येत असलेल्या विद्यार्थिनींच्या भरधाव दुचाकीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकीचा जागीच मृत्यू झाला. दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली तिला सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले; परतु उपचार चालू असताना तिचाही मृत्यू झाला. प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय 17, रा. तांबोळे, ता. मोहोळ) व स्नेहल काशीनाथ वाघमोडे (17, रा. नजीक पिंपरी) अशी मृत मुलींची नावे आहेत. राजीव आप्पाण्णा साळुंकी (रा. इंडी, जि. विजापूर) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
प्रज्ञा व स्नेहल दोघी शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून मोहोळकडे येत होत्या. नजीक पिंपरी गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. दोघीही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. यात प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमी स्नेहल हिला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच स्नेहलचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघीही मोहोळमध्ये अकरावीत विज्ञान शाखेत घेत होत्या शिक्षण
प्रज्ञा कोकाटे ही मोहोळच्या नेताजी महाविद्यालयात अकरावीत विज्ञान शाखेत तर स्नेहल वाघमोडे ही कन्या महाविद्यलयात अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.