सोलापूर

सोलापुरातील एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने पुण्यात मृत्यू

मोहन कारंडे

गुळवंची; पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा पुणे जिल्ह्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागून आज (दि.१७) सकाळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पती, पत्नी व त्यांचा मुलगा या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. सुनिल ऊर्फ सुरेंद्र देवीदास भालेकर (वय ४५), आदिका सुनील भालेकर (वय ४०), परशुराम सुनील भालेकर (वय १७) रा. दापोडी अशी मृतांची नावे आहेत.

मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड गावचे असलेले सुनील भालेकर हे कुटुंब दापोडी-केडगाव परिसरात सेंट्रिंग काम करत होते. त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. त्यांच्या राहत्या घरात वीज पुरवठा केलेली वायर एका उभ्या असलेल्या पत्र्यावर टेकली होती. वा-याने हलून हलून या वायरचे वरील आवरण निघून गेले होते. तेथून वीज प्रवाह घरात उतरला होता. आज सकाळी सुनील भालेकर टॉवेल वाळत घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आदिका प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दोघांना वाचविण्यासाठी परशुरामने त्यांना ओढत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यांची एक मुलगी शिकवणीसाठी बाहेर गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली. तर दुसरा मुलगा मूळ गावी आहे. घटनास्थळाला वीज कंपनीचे अधिकारी व पोलिस अधिका-यांनी भेट दिली. मृतांचे शवविच्छेदन करून अंत्यविधी त्यांच्या मूळगावी करण्यात येणार आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खेड गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT