alcohol संग्रहित फोटो 
सोलापूर

Solapur Takli Sikandar illegal liquor seizure| टाकळी सिकंदरमध्ये अवैध दारूसाठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोहोळ पोलिसांची दमदार कारवाई; ५६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे विनापरवाना अवैध दारूसाठा बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रॉयल इम्पॅक्ट कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची झाकणे, असा एकूण ५६ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना अल्लामीन तांबोळी, समाधान पठाण गायकवाड आणि गणेश प्रभाकर शेटे (तिघेही रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास टाकळी सिकंदर येथे आरोपींच्या राहत्या घराच्या आडोशाला विनापरवाना मद्यसाठा बाळगल्याचे आढळून आल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत रॉयल इम्पॅक्ट कंपनीच्या ३२ बॉक्समधील प्रत्येकी ७५० मिली क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या, असा एकूण ५३ हजार ७६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी ९०० प्लास्टिकची झाकणे, ज्यांची किंमत १ हजार ८०० रुपये, तसेच ४०० प्लास्टिकच्या झाकणांचा आणखी एक साठा, ज्याची किंमत ८०० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश खलाटे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे दि. २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दासरी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT