सोलापूर : थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक विभागीय साखर सहसंचालक कार्यालयासमोर आज (दि.९) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकविली असल्याने स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसांत बिले देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मागील सहा महिन्यांपासून ऊस बिले जमा केलेली नाहीत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्याने ऊस दराची स्पर्धा करुन शेतकऱ्यांना दहा दिवसांत बिल जमा करतील, असे वाटत असतानाच साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस थकविली आहेत.
काही साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त पैसे दिले आसे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उस बिले अदा केलेली नाहीत. तरी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले लवकरात लवकर जमा करण्यास साखर कारखानदारांना भाग पाडावे, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक विभागीय साखर सहसंचालक कार्यालय सोलापूर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी इक्बाल मुजावर , विजय रणदिवे, पप्पू पाटील , शहाजी सोमवंशी , मोहसिन बिराजदार, दत्तात्रय पांढरे, नितीन मस्के, श्रीपती ढुणे उपस्थित होते.
थकीत बिले न मिळाल्याने आंदोलन केले आहे. बिले जमा करू, असे आश्वासन सहसंचालक विभागीय साखर सहसंचालक यांनी दिले आहे. पंधरा आँगस्ट पर्यंत संपूर्ण थकीत ऊस बिले ( FRP) न मिळाल्यास संघटनेच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे.