Sushilkumar Shinde CPI(M) meeting
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवास्थानी माकप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. Pudhari News Network
सोलापूर

सोलापूर विधानसभा | प्रणिती यांच्या रिक्त मतदारसंघात आडम मास्तरांना संधी - शिंदे यांचे सूतोवाच

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : विद्यमान आमदार प्रणिती शिंदे सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेलेल्या आहेत. त्यामुळे सोलापूर शहर विधानसभा मतदार संघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल आणि २००४ सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल, असे आश्वासन माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (दि. १०) झालेल्या बैठकीत दिले. यावेळी अनेक जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी सोलापूर शहर विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक झाली.

भारतात लोकशाही आणि समाजवादाची मुल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहे. २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी च्यावतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीत सोडून निवडून आणले.

वास्तविक पाहता त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश यलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती. याकरिता त्यांना २००४ साली आघाडीत जागा सोडण्यात आली.

यावेळी या शिष्टमंडळात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. अब्राहम कुमार, कॉ. म.हनिफ सातखेड, कॉ. शंकर म्हेत्रे, अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, मोहन कोक्कुल, अरुण सामल, शामसुंदर आडम, आदींची उपस्थिती होती.

SCROLL FOR NEXT