सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, दरवर्षी घेतला जाणारा विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव दि. 29 व 30 रोजी व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. व्ही. बी. पाटील, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे व प्रा. बी. व्ही. शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 29 रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. या संशोधन महोत्सवाचे पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. 30 रोजी दुपारी तीन वाजता बालाजी अमाईन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राम रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी या संशोधन महोत्सवाला शहर व परिसरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे विद्यापीठाचे डॉ. विकास पाटील व आविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे, शिवदारे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचा सहभाग
100 महाविद्यालयातील 391 (पदवी स्तरीय 237, पदव्युत्तर स्तरीय 111 आणि पी.पी.जी. 43) स्पर्धक मानव्यविद्या, वाणिज्य, कृषी, विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, इंजिनीअरिंग अशा 6 विविध गटांमध्ये विद्यार्थी आपले संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये मानव्यविद्या गट 66, वाणिज्य व व्यवस्थापन 59, विज्ञान 71, शेती व पशुविज्ञान 69, इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान 64 व औषध निर्माणशास्त्र 62 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.