सोलापूर येथील तुळजापूर नाका पुलाजवळ एस.टी. बस बंद पडल्याने वाहतूक ठप्प (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Traffic Jam | सोलापूर येथील तुळजापूर नाका पुलाजवळ एस.टी. बस बंद पडल्याने वाहतूक ठप्प

३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; नागरिकांच्या मदतीने बस रस्त्याच्या कडेला हलवली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील तुळजापूर नाका पुलाजवळ रविवारी रात्री सुमारे सातच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एमएसआरटीसी) एस.टी. बस अचानक बंद पडल्याने सोलापूर-धाराशिव महामार्गावरील वाहतूक तब्बल तासभर विस्कळीत झाली. परिणामी महामार्गावर ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

सोलापूर आगारातील एमएच १४ बीटी ३७९६ ही एस.टी. बस धाराशिवहून सोलापूरकडे येत असताना तुळजापूर नाका पुलाजवळ अचानक एअर पकडल्याने रस्त्याच्या मध्यभागी थांबली. त्यामुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी आणि जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही काळ परिसरात तणावपूर्ण आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

बस बंद पडल्याने प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, उपस्थित नागरिक आणि वाहनधारकांनी तत्परतेने पुढाकार घेत बसला धक्का देत ती रस्त्याच्या कडेला हलवली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे वाहतूक काही वेळातच सुरळीत होऊ लागली.

उपस्थित ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अचानक झालेल्या कोंडीमुळे त्यांना चांगलीच कसरत करावी लागली.

वाहतूक ठप्प झाल्याने अनेक नागरिक, प्रवासी तसेच मालवाहतूक वाहनधारक यांना काही काळ त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे वाहतुकीची शिस्त राखणे आणि सार्वजनिक वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.

प्रवाशांनी सांगितले की, “अशा प्रकारे बस बंद पडल्याने वाहतुकीचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून अशा बसांची नियमित तपासणी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असली, तरी नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT