Solapur Pune Highway Truck Tanker Accident
पाकणी : पाकणी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर शुक्रवारी (दि. 14 ) सायंकाळी चार ते सव्वाचारच्या सुमारास मालवाहतूक ट्रक आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या इंधन टँकरमध्ये धडक झाली. या अपघातात टँकरचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने येणारा मालवाहतूक ट्रक (क्र. DQ 6908) आणि पाकणी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम केंद्रातून इंधन भरून सोलापूरच्या दिशेने निघालेला टँकर (क्र. MH 23 BJ 7071) यांच्यात धडक झाली. धडकेमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरचे नुकसान झाले.
अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला हटविल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पाकणी येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तीन प्रमुख कंपन्यांचे इंधन प्रकल्प आहेत. येथून दररोज मोठ्या प्रमाणात इंधन टँकरद्वारे विविध जिल्ह्यांत पाठविले जाते.
मात्र, पाकणी गावाकडून येणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील सोलापूर-पुणे मार्गाला विरुद्ध दिशेने जोडला जात असल्याने या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी झालेला अपघात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर आणि मालवाहतूक ट्रकमध्ये झाला. टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील इंधन असल्याने अपघातानंतर आग किंवा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील विरुद्ध दिशेची वाहतूक तातडीने बंद करून सुरक्षित आणि अधिकृत वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
पाकणी गावाकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र व अधिकृत वाहतूक मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी टँकर चालक संघटना आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे केली आहे.