Solapur Pune Highway Accident
मोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि.६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडाचीवाडी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगु भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३, तिघेही रा. कल्याण) यांचा मृत्यू झाला. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारंबे कुटुंबीय कारमधून सोलापूर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होते. दीपावलीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून ते परतत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात मृत आणि जखमी झालेले रस्त्यावर पडले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अपघात पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.