Solapur News : माढा ग्रामीण रुग्णालयावर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

सोनोग्राफी, डायलिसिस युनिटसह आवश्यक सुविधा सुरू करण्याच्या सूचना
Solapur News : माढा ग्रामीण रुग्णालयावर आरोग्यमंत्र्यांची नाराजी
Published on: 
Updated on: 

माढा : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माढा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील कामकाजाबाबत त्यांनी असमाधान व्यक्त करत सोनोग्राफी, डायलिसिस युनिटसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रसूतींची संख्या आणि रुग्णालयातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची संख्या, दरमहा होणाऱ्या सामान्य प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रियांची माहिती डॉक्टरांकडून घेतली. दररोज सुमारे ३०० रुग्णांची ओपीडी होत असल्याचे, तर महिन्याला चार सामान्य प्रसूती आणि चार सिझेरियन प्रसूती होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूती सेवांचा आढावा घेताना त्यांनी सिझेरियन सुविधेबाबत अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. खासगी डॉक्टरांशी टाय अप करुन आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येतील का, याबाबत विचारणा केली. त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक जागेची माहितीही त्यांनी घेतली. सोनोग्राफीसह इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा माढा ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध झाल्यास परिसरातील रुग्णांची गैरसोय कमी होईल, या दृष्टीने त्यांनी नियोजन करण्यास सांगितले. मागील काळात माढा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका महिलेकडून स्वच्छतेचे काम करून घेतल्याच्या गंभीर प्रकाराबाबतही मंत्री आबिटकर यांनी विचारणा केली. संबंधित वैद्यकीय अधीक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या घटनेची दखल घेत त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. रुग्णालयात स्वच्छता व शिस्त पाळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, यापुढे रुग्णांची तक्रार येणार नाही, असे कामकाज करावे, असे सांगितले.

यावेळी आमदार अभिजित पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख भैय्या खरात, पंडितराव साळुंखे, अमोल केसरे, साईराज साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक सदानंद व्हनकळस आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.