करमाळा : दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा भाजपचे प्रा. रामदास झोळ यांचे भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरून भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेत पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे करमाळा तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री, पोलिसांचे पथक भिगवण जवळील दत्तकला शिक्षण संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दुस-या दिवशी मंगळवार सकाळ पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम असल्याची माहिती आहे.
या कारवाई दरम्यान संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे शिक्षण संस्थेत उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून कोणती माहिती घेण्यात आली किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भोंदू मनोहर भोसले यांच्याशी प्रा. रामदास झोळ यांचे कथित आर्थिक संबंध असल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत.
या आरोपांच्या अनुषंगानेच पोलिसांकडून संस्थेतील आर्थिक व्यवहार व संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, झोळ आणि भोसले यांच्यात प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले, त्यांची रक्कम किती होती किंवा या व्यवहारात कोणाची भूमिका होती, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. दरम्यान, पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा धागेदोरे हाती लागल्याची चर्चा असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.