

बार्शी : सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशनचा गहू आणि तांदूळ शासकीय बारदाणा बदलून प्लास्टिक पोत्यात भरून काळाबाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी ३१ लाख १५ हजार ९८१ रुपयांचा गहू, तांदूळ, उडीद, ट्रक आणि पिकअपसह एकूण मुद्देमाल जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
धनाजी अर्जुन मांगडे (वय ५०), गजेंद्र अरूण मांगडे (वय ५२, दोघे रा. मांगडे चाळ, बार्शी) ट्रकचालक चांगदेव पिराजी दळवी (वय ४२, रा. खांडवी), गणेश श्रीहरी कदम (वय ३०, रा. सरणवाडी, ता. परंडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बार्शी येथील पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड यांनी फिर्याद दिली. तहसीलदार एफ. आर. शेख यांनी माहिती दिली की, फपाळवाडी (ता. बार्शी) येथे रेल्वे स्टेशनसमोर अरणगावकडे जाणाऱ्या रोडलगत मांगडे यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये रेशनचा साठा करून तो ट्रक आणि पिकअपमध्ये भरून विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे पत्राशेडसमोर ट्रक (क्र. एमएच ११ एम ६४९२) आणि पिकअप (क्र. एमएच १० एक्यू ८११२) उभे होते. त्यामध्ये हमाल गहू आणि तांदूळ भरत होते. पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर ट्रकमध्ये १९५ पोती गहू, तर पिकअपमध्ये १५ पोती गहू आणि ४९ पोती तांदूळ आढळले.
पत्राशेडमध्ये १२० पोती तांदूळ, तीन पोती गहू आणि चार पोती खराब उडीद होते. त्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हील सप्लायज कोर्पोरेशन लि. असे छापील शासकीय बारदाणाही मिळून आले. या प्रकरणी चौघांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.