मोहोळ तहसीलमध्ये सोलर योजनांची माहिती देण्यात आली 
सोलापूर

PM Surya Ghar Yojana Solapur| २५ वर्षे वीज मोफत अन् वीज बिल थेट शून्य; मोहोळ तहसीलमध्ये सोलर योजनांची माहिती

सेवा सेतू अभियानाचे यश, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार शिबिर

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर- महावितरणच्या सेवा सेतू अभियानांतर्गत मोहोळ येथील तहसील कार्यालयात वीज ग्राहकांसाठी माहितीपर शिबिर घेण्यात आले. मोहोळ शहर व पंचक्रोशीतील ग्राहकांना या शिबिरातून विविध योजना व ग्राहक सेवांची माहिती देण्यात आली.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना छतावरील सौर प्रकल्पासाठी अनुदान उपलब्ध आहे. २ किलोवॅटपर्यंत ३० हजार रुपये प्रति किलोवॅट आणि त्यापुढील अतिरिक्त क्षमतेसाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट, कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एवढेच नव्हे तर महावितरण मार्फत राबविल्या जाणाऱ्या स्मार्ट रूफटॉप सोलर योजनेद्वारे देखील दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती व जमाती, आणि दुर्बल घटकातील ग्राहकांना सुद्धा १ किलोवॅटचा सौर प्रकल्प मिळतो.

योजनेमुळे २५ वर्षे वीज मोफत मिळते शिवाय घरगुती वीजबिल सुद्धा शून्य होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना २,५०० रूपये, अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना ५,००० रुपये, तर इतर आर्थिक दुर्बल ग्राहकांना १०,००० रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज महावितरणच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येत असून, प्रक्रिया सुलभ व पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती मोहोळ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गुलाम पटवेगर यांनी दिली.

तसेच दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांमधील पात्रता, अनुदान व लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. स्मार्ट सोलरसह इतर योजनांची माहिती देताना नवीन वीज जोडणी, नावात बदल अथवा दुरुस्ती तसेच वीजबिलासंबंधी तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे अभियंता गुलाम पटवेगर यांनी सांगितले.

या शिबिरावेळी तहसीलदार सचिन मुळीक, मोहोळ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गुलाम पटवेगर, कुरूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कारंडे, मोहोळ शहर शाखा अभियंता नागेश खडतरे, सुशील देवकर, सत्यनारायण वडगावकर, आकाश बचुटे, सुरेश करे, विजय कोथाळे, प्रशांत गायकवाड, वंदना एकबोटे, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT