Pandharpur Rickshaw Driver Killed
पंढरपूर : पंढरपूर शहरातील अनिल नगर भागातील एका 24 वर्षीय रिक्षाचालकाची किरकोळ वादातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आला आहे. तर एक पाय त्याच्या घरावर दरवाजासमोर लटकवण्यात आला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.१५) रात्री घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित मधुकर कोरे (वय 24 )असे हत्या झालेल्या रिक्षा चालक तरुणाचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, रोहित कोरे या तरुणाचा मृतदेह पंढरपूर येथील रेल्वे ट्रॅक वरती छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तर एक पाय त्याच्या घरावर दरवाजासमोर लटकवण्यात आला. यानंतर ही घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
रोहित कोरे हा रिक्षा चालवत होता. त्याचा काही जणांशी दारू पिऊन किरकोळ वाद झाला होता. या वादातून त्याची हत्या झाली असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान , रेल्वे पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून त्याचा पंचनामा केला होता. परंतु, रोहित कोरे या तरुणांच्या घरावर त्याचा पायाचा तुकडा आढळून आल्याने रेल्वे रूळावर आढळून आलेला मृतदेह हा रोहित याचा असल्याचे समोर आले आहे.
रोहित हा कधीही रेल्वे रुळावर जात नाही. परंतु , सोमवारी रात्री 11.30 वाजता त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्याला घरातून घेऊन गेले होते. घेऊन जाणारे देखील दारू पिलेले होते. तेव्हा रोहित याने त्याच्या आईला भांडण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. किरकोळ भांडणातूनच त्याची हत्या केली आहे. ज्यांनी कोणी हत्या केली. त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहित च्या आईने केली आहे.