Tanker Collision two youths injured Pakani
पाकणी: पाकणी येथे आज (दि. 30) सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडकडे इंधन भरण्यासाठी जाणारा टँकर ( MH 25 U 9899) याने मोटारसायकल (MH 13 EA 5712) ला धडक दिली. या अपघातात चिंचोळी एमआयडीसीकडे जाणारे भरत पांडुरंग अवताडे व महादेव पांडुरंग अवताडे (रा. पाकणी) जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात गावातील युवक जखमी झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नागरिकांनी अचानक रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे रस्त्यावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत टँकरच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतुकीत मोठा खोळंबा झाला.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गुळवे, हवालदार कोडक, खंडागळे, चंदनशिवे, अत्तार तसेच पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनीही मदत करून वाहतुकीला गती दिली. या वेळी सरपंच बालाजी येलगुंडे, मधुकर शिंदे, तुकाराम येलगुंडे, शिवाजी यादव, सोनूपंत येलगुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.