

Solapur Pune highway road accident youth killed
मोडनिंब: सोलापूर-पुणे महामार्गावरील शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. वडाचीवाडी येथे जात असलेला ३० वर्षीय दुचाकीस्वार बापू हरिबा निळे (रा. वडाचीवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्या दुचाकीला ( MH 45 AT 0260) भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि त्या अज्ञात वाहनाचे टायर त्याच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २२) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख उमेश भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहोळ येथून खासगी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह मोहोळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने मृतदेह ओळखण्यास कठीण स्थितीत होता. पोलिस अधिकारी किरण आवताडे आणि महामार्ग मदत केंद्राचे कर्मचारी, तसेच मोहोळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला मोहोळ येथील खासगी रुग्णवाहिकेमधून वरवडे टोल नाका येथील डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे आणि शेटफळ येथील ग्रामस्थांच्या मदतीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.