सोलापूर

Electricity Supply Issues Solapur: पाच तासांच्या वीजपुरवठ्यातही वारंवार खंड; संतप्त शेतकऱ्यांचा उळे उपकेंद्राला टाळे

पहाटे तीन वाजता वीज न आल्याने शेतकरी संतप्त; टायर जाळून महावितरणचा निषेध; आठ दिवसांत आठ तास वीज देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

संतोष पवार

कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) : कृषी पंपांसाठी सध्या केवळ पाच तासांचा वीजपुरवठा होत असून, त्यातही वारंवार ट्रिपिंग आणि वीज खंडित होत असल्याने बोरामणी जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरुवारी पहाटे उळे येथील महावितरण उपकेंद्रासमोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत कार्यालयाला टाळे ठोकले.

नेहमीच्या वेळेनुसार पहाटे तीन वाजता वीज येईल, या अपेक्षेने पिकांना पाणी देण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. तास-दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपकेंद्रासमोर जमले. यावेळी महावितरणविरोधात घोषणाबाजी करत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

गंगेवाडी, कासेगाव, उळे, उळेवाडी, वडजी, बक्षीहिप्परगा, बोरामणी, मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी, वरळेगाव, मुळेगाव, दोड्डी आणि मुळेगाव तांडा परिसरातील शेतकरी या वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सध्या पहाटे तीन ते आठ या वेळेत पाच तासांचा वीजपुरवठा नियोजित आहे. मात्र, या पाच तासांतही वारंवार वीज खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. काही वेळा दहा-दहा मिनिटांच्या अंतराने वीज जात असल्याने प्रत्यक्षात पाच तासांचाही वीजपुरवठा मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचा संताप अनावर

वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘महावितरणचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. आंदोलनस्थळी टायर जाळूनही महावितरणच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वीज उपलब्ध असली तरी ती सुरळीत मिळत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. थ्री-फेज वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली. त्यामुळे खरीप पिकांच्या सिंचनाचे नियोजन कोलमडले असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांचीही गैरसोय

शेतातील वाड्या-वस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, घरगुती कामांवर तसेच जनावरांच्या देखभालीवर परिणाम होत आहे.

रात्रीच्या वेळी वीज नसल्याने जंगली प्राणी व विषारी सापांचा धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, गावात चोरीच्या घटना वाढल्याने वीज गेल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. गावातील पाणीपुरवठ्यावरही वीज समस्येचा परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली.

दिवसा आठ तास वीजपुरवठ्याची मागणी

कृषी पंपांसाठी दररोज दिवसा आठ तास सुरळीत थ्री-फेज वीजपुरवठा करावा, तसेच सिंगल-फेज वीजपुरवठा २४ तास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष क्षेत्रात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.

या भागातून जाणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना मात्र मर्यादित वेळेतही सुरळीत वीज का मिळत नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

पोलिस प्रशासन घटनास्थळी

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील मोरे व पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल यादव यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत महावितरणकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली.

सहा महिन्यांत नवीन उपकेंद्राचे आश्वासन

आंदोलनाची दखल घेत महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी सकाळी सुमारे नऊ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या भागातील वाढती वीज मागणी लक्षात घेऊन आगामी सहा महिन्यांत या परिसरासाठी आणखी एका उपकेंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात वीजपुरवठ्याच्या अडचणी कमी होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

आठ दिवसांत आठ तास वीजपुरवठा

शाखाधिकारी तथा सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनी सांगितले की, देखभाल-दुरुस्तीची कामे आणि ट्रिपिंगमुळे सध्या वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आजपासून पाच तासांऐवजी तीन टप्प्यांत सात तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल. तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पुन्हा आठ तासांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन

महावितरणकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यापुढे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास सध्याच्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

पंचायत समिती कासेगाव गणाचे सदस्य विजय राठोड म्हणाले, “या भागातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येची आम्हाला जाणीव आहे. मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या पाच तासांचा वीजपुरवठा असून तो आठ तास करणे आवश्यक आहे. व्यावसायिक क्षेत्राला २४ तास वीज मिळत असेल तर शेतकऱ्यांना आठ तासही सुरळीत वीज का मिळू नये? खरीप पिके सुकत चालली असून त्यांना पाणी देण्यासाठी नियमित वीजपुरवठा गरजेचा आहे.”
विजय राठोड, पंचायत समिती कासेगाव गणाचे सदस्य
उळे येथील शेतकरी मनोज गुंड म्हणाले, “सध्या पाच तासांचा वीजपुरवठा आहे; मात्र वारंवार खंड पडत असल्याने प्रत्यक्षात कमी वेळ वीज मिळते. शेतकऱ्यांवर संकट असताना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. महावितरणने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
मनोज गुंड, शेतकरी
उळे येथील शेतकरी दिनेश शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळावी. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष फिल्डवर उपाययोजना होणे गरजेचे आहे.”
दिनेश शिंदे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT