सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली. यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांतील समन्वय आणि जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराबाबत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले गेले आहेत.
श्री सिद्धेश्वर महायात्रा (गड्डा यात्रा) दि. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत श्री सिद्धेश्वर महायात्रा अनुषंगाने दि. 8 जानेवारी रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन भवन सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस दुपारी 3.30 वाजेपर्यंत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच इन्सिडेंट कमांडर तथा नगर अभियंता सारिका आकुलवार यांची अनुपस्थिती होती.
श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 या महत्त्वपूर्ण बैठकीची वेळ होऊन अर्धा तास झाला तरी महापालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती बाबत नाराजी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची महत्त्वपूर्ण यात्रा होत असून आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवलेला निष्काळजीपणा अत्यंत चुकीचा असून याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संचालक यांना तत्काळ पाठवण्याचे निर्देश दिला आहे. -कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर