Fox Attack in Mungshi Solapur
वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी परिसरात कोल्ह्याने दोIex इसमांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यात दिलीप अर्जुन क्षीरसागर आणि योगेश लक्ष्मण राक्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मुंगशी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंगशी परिसरात कोल्ह्याचा वावर वाढला असून, अचानक झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात दिलीप अर्जुन क्षीरसागर व योगेश लक्ष्मण राक्षे यांना कोल्ह्याने चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या.
जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमा खोल असल्याने तसेच पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेनंतर मुंगशी परिसरातील नागरिकांमध्ये कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी, शेतमजूर तसेच सकाळ-संध्याकाळ शेताकडे जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्ह्याचा वावर नेमका कोणत्या परिसरात आहे, याचा शोध घेऊन वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी तसेच शेतशिवारात एकट्याने जाणे टाळावे आणि कोल्हा दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच हातात काठी, बॅटरीचा वापर करावा असे आवाहन वन अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी केले आहे संबंधित यंत्रणांनी या घटनेची दखल घेऊन परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी मुंगशी ग्रामस्थांनी केली आहे.