Police Raid File Photo
सोलापूर

Solapur Crime | मोहोळातील लॉजवर धाड; मालक, व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा, महिलेची सुटका

अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Solapur Mohol Lodge Police Raid

मोहोळ : मोहोळ शहरातील एका लॉजमध्ये कथित अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने धाड टाकून एका महिलेची सुटका केली. या प्रकरणी लॉज मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ-कुरूल मार्गावरील शहर हद्दीतील छावा हॉटेल अँड लॉजिंग येथे हॉटेलच्या आडून बेकायदेशीररित्या अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत गुरूवारी छापा टाकला. कारवाईदरम्यान आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी अमित नानासाहेब मोटे (वय ३८, रा. यशवंतनगर, मोहोळ) व श्रीकांत लक्ष्मण कसबे (वय २६, रा. आठवडा बाजार परिसर, मोहोळ) यांच्याविरुद्ध स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, तिची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणामागे मानवी तस्करी किंवा संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण येथील महिला पोलीस अधिकारी शारदा घोळवे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर मोहोळ परिसरातील लॉज आणि हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, या व्यवसायामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT