Mohol Police Inspector Deepak Patil Warning
मोहोळ शहर : महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाने निर्धारित केलेले नियम आणि आवश्यक परवानग्यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता कोणत्याही ठिकाणी महापुरुषांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिला आहे.
पुतळा उभारण्यासाठी नागरिकांच्या भावना आणि महापुरुषांविषयी असलेला आदर लक्षात घेणे आवश्यक असले, तरी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन पुतळा उभारणे अथवा त्यासाठी प्रयत्न करणे प्रशासन खपवून घेणार नाही. बेकायदेशीर पुतळा उभारणीसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती, त्यासाठी सहकार्य किंवा नियोजन करणारे तसेच प्रत्यक्ष पुतळा बसविणाऱ्या व्यक्तींवरही नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुतळा उभारणीच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांनी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी प्रशासनाची आवश्यक परवानगी घेणे गरजेचे आहे. परवानगीशिवाय पुतळा उभारण्याचा प्रयत्न करून कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
दरम्यान, महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उभारणीबाबत नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच पुढील कार्यवाही करावी. अनधिकृत पुतळा उभारणीचा प्रयत्न आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिल्याने अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.