

करमाळा : पावसाळ्याचे दिवस सरत असतानाही करमाळा तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतशिवारातील पिकांवर संकटाचे सावट असून तालुक्यात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर खरीप हंगामात उडीद तुर मका बाजरी कांदा या पिकांची 25 हजार 369 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, पावसाने पुरेशी साथ न दिल्याने पिकांची वाढ खुंटली असुन जिरायती क्षेत्रावरील उडीद पिक पाण्याअभावी जळून गेले आहे. गेली 40 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून, विहिरी, बोअरवेल तसेच इतर जलस्रोतांवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे....
पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस आणखी लांबल्यास तूर,मका,बाजरी ही खरीप हंगामातील उभी पिके सुध्दा जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. गतवर्षी सीना नदी तीनदा ओव्हर फ्लो झाली होती यंदा मात्र सिना नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. तालुक्यातील वडशिवणे, मांगी, कोंढेज, नेरले, पारेवाडी, राजुरी, हिंगणी व म्हसेवाडी या लघु प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे
पिकांची पाहणी व मदतीची अपेक्षा
पावसाअभावी बाधित होणाऱ्या गावांमध्ये महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पाहणी केली आहे.परिस्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच पिकांची स्थिती लक्षात घेऊन पंचनामे, पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना आणि तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी अण्णासाहेब सुपनवर, (जिल्हा सरचिटणीस भारतीय किसान मोर्चा) यांनी केली आहे