theft Pudhari
सोलापूर

Haralwadi Theft Case | मोहोळ तालुक्यातील हराळवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ! अज्ञात चोरट्यांनी पाच घरांमधून लाखोंचा ऐवज चोरी

Haralwadi Theft Case | या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कामती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोड्या करत पाच घरांमधून तब्बल ७ लाख ८९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कामती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

याबाबत रेवणसिद्ध दामोदर शेळके (वय ५०, रा. हराळवाडी, ता. मोहोळ) यांनी कामती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २६ मे रोजी रात्री कुटुंबीयांनी जेवण आटोपल्यानंतर उकाड्यामुळे सर्वजण अंगणात झोपले होते. २७ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते उठून घरात गेले असता घरातील कपाटे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरासमोर पर्स पडलेली दिसल्याने चोरी झाल्याचा संशय आला. त्यानंतर परिसरात चौकशी केली असता शेजारी राहणारे महिंबर मच्छिंद्र शेळके आणि रेवणसिद्ध वसंत शेळके यांच्या घरातही चोरी झाल्याचे उघड झाले.

घटना समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पुढील चौकशीत रामचंद्र दत्तात्रय शेळके आणि अमोगसिद्ध रंगनाथ धोडमिसे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केल्याचे स्पष्ट झाले. गावातील नागरिकांनी तत्काळ कामती पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तपासासाठी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आले.

चोरट्यांनी रेवणसिद्ध दामोदर शेळके यांच्या घरातून सोन्याच्या अंगठ्या, कानातील फुले, बदाम, चांदीचे करतोडे, पैंजण, नथ तसेच २० हजारांची रोकड असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. महिंबर मच्छिंद्र शेळके यांच्या घरातून सोन्याची बोरमाळ आणि गंठण असा १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. रेवणसिद्ध वसंत शेळके यांच्या घरातून सोन्याच्या अंगठ्या, गंठण आणि ३५ हजार रुपयांची रोकड असा ३ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

याशिवाय रामचंद्र दत्तात्रय शेळके यांच्या घरातून सोन्याचे झुबे, बुगडी आणि १० हजारांची रोकड असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तर अमोगसिद्ध रंगनाथ धोडमिसे यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि ४० हजार ८०० रुपयांची रोकड असा १ लाख ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.

फिर्यादीनुसार, २६ मे रोजी मध्यरात्री ते २७ मे रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरांचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला आणि चोरी केली. विशेष म्हणजे बहुतांश कुटुंबीय अंगणात झोपलेले असल्याने चोरट्यांनी संधी साधून शांतपणे चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे हराळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

कामती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि स्थानिक गुन्हेगारांची माहिती तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT